डॉ. अभय देशपांडे (खगोल मंडळ)
या दिवाळीत देशभरात लोकांनी काळजी घेत फटाक्यांची आतषबाजी केली नाही. ट्या कमतरतेची भरपाई देण्यासाठी, आकाशात सर्वांसाठी एक विशेष आतषबाजीचे सत्र आयोजित होत आहे. आपल्या कॅलेंडरमध्ये 17 नोव्हेंबर 2020 ची रात्री राखून ठेवा. आज सिंहस्थ उल्कावर्षावाची रात्र आहे. आज रात्री, मध्यरात्रीनंतर सिंह राशीच्या दिशेने येत बऱ्याच तेजस्वी उल्का पहावयास मिळतील.
उल्का म्हणजे काय ?
उल्का म्हणजे काळोख्या आकाशात दिसणारी प्रकाशाची एक लकीर होय. आपण बर्याचदा त्याला तुटणारातारा असे म्हणतो. वास्तवात, हा तारा नसून अवकाशातील फक्त एक दगड असतो जो गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे आकर्षित होते. हा छोटासा दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो आणि वातावरणात जळत जातो. त्यामुळे आपल्याला आकाशात अचानक चटकन जळणारी तेज:पुंज रेषा दिसते. त्यालाच ‘उल्का’ असे म्हणतात.
उल्कावर्षाव का दिसतो ?
बरेच धूमकेतू पृथ्वीच्या कक्षेला भेदून सूर्याकडे जातात. पृथ्वीची कक्षा ओलांडत असताना, अनेकदा ते आकाशात पृथ्वीच्याकक्षेजवळ त्यांच्या शेपटातील कचऱ्याचा ढिगारा मागे सोडतात. सूर्याभोवतीच्या भ्रमंतीमध्ये, जेव्हा पृथ्वी या ठिकाणी पोहोचते तेव्हा त्या कचऱ्यातील अनेक दगड पृथ्वीकडे खेचले जातात. जर ते पृथ्वीच्या वातावरणात आले तर त्या विशिष्ट रात्री अनेक उल्का दिसतात.या घटनेला उल्कावर्षाव म्हणतात. पृथ्वी आपल्या मार्गाने पुढे जाईल आणि सुमारे एक वर्षानंतर त्याच ठिकाणी परत येमग पुन्हा आपल्याला असा वर्षाव दिसेल. ज्या तारकासमूहाच्या समोर हा वर्षाव दिसतो त्याच नावाने तो वर्षाव ओळखला जातो.
सिंहस्थ उल्कावर्षाव म्हणजे काय ?
सिंह राशीच्या पार्श्वभूमी पुढे घडणाऱ्या उल्का वर्षावाला ‘सिंहस्थ उल्कावर्षाव’ म्हणतात. हा वर्षाव टेंपल-टटल या धूमकेतू मूळे होतो. १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान घडणारा हा एक अत्यंत प्रसिद्ध वर्षाव आहे. या वर्षावाचा सर्वोच्च बिंदु १७ नोव्हेंबरच्या रात्री असतो व त्यावेळी ताशी १०० ते २०० उल्का दिसू शकतात. दर वर्षी अशा वर्षावादरम्यान कैक टन अंतराळधूळ पृथ्वीवर येते.
प्रत्येक वर्षावाचा ताशी दर. त्याला Zenithal Hourly Rate (ZHR) असे म्हणतात. सिंह उल्का वर्षावाचा साधारण ZHR १५- ते -२० उल्का प्रती तास एवढा आहे. दर ३३ वर्षांनी या वर्षावाचा सर्वोच्च वर्षाव असतो व त्या दरम्यान ताशी १००० उल्का दिसू शकतात. त्याला ‘उल्का वादळ’ म्हणतात.
१९९९ मध्ये झालेले उल्कावादळ बघायला खगोल मंडळ कार्यक्रमाला १०,००० पेक्षा जास्त लोक आले होते.
२०२० चा वर्षाव आपल्या साठी कदाचित अत्यंत चांगला ठरेल असे भाकीत आहे. अमावस्या नुकतीच झाल्याने चंद्र रात्री नसेल. मध्यरात्री नंतर सिंहरास सहज दिसेल. त्याच बरोबर उल्कासुद्धा दिसू लागतील. खालील नकाशा पहा.
महत्वाचे लक्षात घ्या. अनेक उल्का दिसायला आकाश स्वच्छ हवे आणि शक्य तेवढे गडद काळे हवे. प्रकाश प्रदूषणापासून शक्य तेवढ्या दूर गेल्यास असंख्य उल्का दिसतील. मुंबईसारख्या ठिकाणी आपण केवळ 3-4 तेजस्वी उल्का पाहू शकाल …. परंतु जर आपण नेरळ, कर्जत किंवा कसारा प्रदेशात गेलात तर आपल्याला ताशी २०-४० उल्का पहायला मिळतील. बहुतांश उल्का अंधुक असतात आणि त्या पहाण्यासाठी आकाश स्थिति चांगली असणे आवश्यक आहे.
इतर प्रसिद्ध उल्का वर्षाव कोणते ?
वर्षभर बरेच उल्का वर्षाव दिसतात. काही प्रमुख वर्षाव खालील प्रमाणे आहेत. नोव्हेंबरच्या सिंह वर्षावा नंतर लगेचच डिसेंबर मध्ये आपण मिथुन राशीति वर्षाव पाहू शकता.
उल्का खूप मोठी असल्यास व पुर्ण जळून न-गेल्यास काय होते?
हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे की उल्काखंड हा एक लहान दगड, धूळ-कण किंवा अवकाशातील कचरा आहे. पृथ्वीच्या वातावरणात ते जळून जातात. परंतु जर खडक मोठा असेल तर कदाचित तो पूर्णपणे जळणार नाही. असा खडक खाली पडताना जळत राहील व अखेर उरलेला दगड पृथ्वीवर आदळेल. अशा आघात करणाऱ्या दगडाला ‘अशनी’ म्हणतात. जर अशनी छोटासा असेल तर तो शोधणे हा काही लोकांचा व्यवसाय देखील आहे. कारण असे अशनी अमूल्य खडकांसारखे महाग असतात. लोक उत्तम किंमतीवर ‘उल्कापिंड’ विकतात आणि हा एक भरभराटीचा व्यवसाय आहे.
जर अशनी खूप मोठा असेल तर होणारा आघात प्रचंड असतो. अशा आघातांमुळे पृथ्वीवर विवर तयार होऊ शकते. यांचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील ‘लोणार विवर’ आहे. जालण्याजवळील ‘लोणार’ या ठिकाणी सुमारे २ किलोमीटर व्यास असलेले व सुमारे १५० मिटर खोल असलेले खाऱ्या पाण्याचे हे विवर ५०,००० हजार वर्षांपूर्वी तयार झालेले असावे.
‘विच्छा माझी पुरी करा..’
अनेक लोक उल्का पडली तर त्याला ‘तुटणारा तारा’ मानतात. हाअ एक गैरसमज आहे. तारे आपल्या पासून खूप दूर असून तुटू शकत नाहीत. आपल्या हयातीत तारे फारसे त्यांचे स्थान बदलत देखील नाहीत.
लोकांचा असाही विश्वास आहे की, जर तुम्हाला काही इच्छा व्यक्त केली व लगेचच उल्का दिसली तर ती इच्छा पुर्ण होते! हा देखील एक गैरसमज आहे. अर्थात गंमत म्हणून आपण इच्छा धरू शकता आणि एक योगायोग म्हणून कदाचित क्वचित ते खरे होऊ शकेल. परंतु नंतर वैज्ञानिकदृष्ट्या तो एक केवळ योगायोग असेल.
मनोरंजनासाठी इच्छा करणे आवडत असेल तर आजच शेकडो ईच्छा तयार करा. आज रात्री, आपल्या मागण्या संपतील… पण उल्का मात्र पडतच राहतील. अशी संधी पुनः पुढच्या वर्षी येईल.. व परत-परत येतच राहील.
खगोल अभ्यासक म्हणून, माझी अशी एकच इच्छा आहे की जवळपास प्रकाश नसेल अशी स्पष्ट रात्र मला १७ नोव्हेंबरला मिळावी व आकाशातील ही नयनरम्य आतषबाजी मला मनसोक्त अनुभवायला मिळावी.