खगोलशास्त्र

Horsehead and Flame Nebula- Lavhali-Badlapurआपल्या सभोवार पसरलेल्या आकाशाचा आणि अथांग अवकाशाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच खगोलशास्त्र. आकाशात रोज रात्रो चमचमणाऱ्या असंख्य तारका,अग्नी गोलासारखा भासणारा आणि दिवसा सर्व दिशा उजळून टाकणारा सूर्य, पृथ्वीच्या विशिष्ठ स्थितीमुळे निर्माण होणारे ऋतू या सर्वांची सांगड घालण्याचा प्रयत्न मानवाने केला नसता तरच नवल! आणि मग त्यातूनच अमुक एका तारका समूहात सूर्य किवा चंद्र असला की एखादी घटना घडून येते असे लक्षात येऊ लागले आणि त्यातूनच ठोकताळे बांधणारे अंदाजशास्त्र तयार झाले.

खगोल शास्त्राचा विकास मात्र धीम्या गतीने परंतु ठामपणे होत होता.या विकास वाटेवर खगोल शास्त्राला धर्म- सत्तेचा व राजसत्तेचाही सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात पृथ्वी हीच विश्वाचा केंद्रबिंदू असल्याची पाश्च्यात्य संकल्पना रूढ झाली होती. ह्या संकल्पनेला धक्का देणारा सूर्यकेंद्री विश्वाचा सिद्धांत इ.स:-१५४३ मध्ये कोपर्निकसने मांडताच त्याला तत्कालीन धर्मसंस्थांनी प्रखर विरोध केला. अर्थातच त्या नंतरच्या केप्लर, गेलिलीओ, न्यूटन आदि खगोल शास्त्रज्ञांनी केलेल्या निरीक्षणांद्वारे कोपर्निकसच्या सिद्धांताचे प्रमाण मिळाल्यानंतर त्याची संकल्पना सर्वमान्य झाली ही बाब वेगळी.

दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम खागोलशास्त्रासाठी करणाऱ्या महान इटालीअन खगोल शास्त्रज्ञ गेलिलीओ गलिली ह्याला देखील अश्या प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. त्याच्यावर धर्मसत्तेविरुद्ध कट करण्याचा आरोप देखील ठेवला गेला.१७ व्या शतकात लावलेले हे आरोप तब्बल तीन शतका नंतर,म्हणजेच १९९२ साली (२० व्या शतकात) मागे घेण्यात आले.

गुढ जाणून घेण्याची मानवी मनाची उत्सुकता त्याच्या विकासाला कारणीभूत ठरत असते.खगोल शास्त्राचा विकास देखील ह्याच तत्वावर आधारलेला आहे.सूर्य आकाशातून भ्रमण करीत असताना त्याच्या तेजामुळे त्याच्या पार्श्वभूमीवरील तारकासमूह पाहता येत नाही. चंद्राच्या भ्रमणमार्गावरील तारकासमूह मात्र त्याच्या पार्श्वभूमीवर पाहता येतात. याचाच वापर करत प्राचीन भारतीयांनी आकाशाची विभागणी चान्द्रमार्गावरील २७ तारकासमुहात केली आणि या ताराकासामुहाना नक्षत्र असे संबोधले.मात्र पाश्चात्यांनी सूर्याचा वर्षाभराचा कालावधी १२ ताराकासमुहान मध्ये विभागला.ज्याना आपण राशी म्हणून ओळखतो.सूर्य व चंद्राचे भ्रमण मार्ग एकाच असल्यामुळे या १२ राशींचे २७ नक्षत्रांमध्ये विभाजन झालेले दिसते. २९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधी मध्ये सूर्य कोणत्याही प्रचलित राशीत नसून तो वृश्चिक आणि धनु या राशींच्या दरम्यान असणाऱ्या भुजंगधारी या तारकासमुहात असतो व म्हणूनच आत्ता भूजंगधारी ताराकासमुहाला १३वी रास म्हणून मान्यता मिळाली आहे.

रात्रीच्या चमकत्या ताऱ्यांनी खचाखच भरलेल्या आकाशात नेमका तारा शोधणे आपल्याला कठीण वाटू शकते.आपल्या पूर्वजांना देखील याची जाणीव होती.व म्हणूनच तारकासमुहांचे आकार लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी अगदी सोपा मार्ग अवलंबिला.तो म्हणजे या ताऱ्यांच्या विशिष्ठ समूहाना वेगवेगळे प्राणी,पक्षी,मानवी आणि दैवी आकृत्यात जोडून त्यांच्यावर गोष्टी गुंफण्याचा. या मार्गाद्वारे आकाश लक्षात ठेवणे व नकाशावर उतरवणे देखील सोपे झाले.

अशा प्रकारची काल्पनिक विभागणी सर्वप्रथम कधी झाली असावी हे सांगणे अवघड असले तरी विविध् आकृत्यात गुंफलेले हे तारकासमूह प्राचीन शिल्पाकृतीतही आढळून येतात.ग्रीक कवी अरेटस याने इसवी सनापूर्वी २७५ मध्ये रचलेल्या “ द फेनामेना“ या काव्यात काही तारका समूहांच्या नावांचा उलेख आढळतो, तर इसवी सनापूर्वी १५० मध्ये “हिप्पार्कस” या ग्रीक खगोल शास्त्रज्ञाने तयार केलेल्या नकाशांमध्ये,ताऱ्यांची विभागणी व त्यांच्या तेजस्विते नुसार केलेली वर्गवारी ही आढळते.

हिप्पार्कसच्या नंतर हे काम अत्यंत शिस्तबद्धपणे केले ते ”टोलेमी” या दुसऱ्या ग्रीक तत्त्ववेत्याने.इसवी सनानंतरच्या दुसऱ्या शतकात १०२२ ताऱ्यांचा नकाशा तयार करण्याऱ्या टोलेमीने Almagest या आपल्या ग्रंथात या ताऱ्यांचे तेजस्विते प्रमाणे वर्गीकरण देखील केले.आणि त्याना १(जास्त तेजस्वी) ते ६ (कमी तेजस्वी) असे प्रत क्रमांक दिले.त्याची ही वर्गीकरण पद्धत आजही वापरली जाते.टोलेमीने ग्रीस मधून दिसणारे आकाश ४८ ताराकासमुहांमध्ये विभागले.पुढे जसजसे निरीक्षणाच्या पद्धती व साधने यांचे आधुनिकीकरण झाले तसतसे या नकाशातील ताराकासामुहांमध्ये भर पडत गेली. मात्र मूळ संकल्पना आजही तीच आहे.

इ.स.१६०३ मध्ये योहान बायरने तयार केलेले आकाश नकाशे हे काहीसे आद्य मानता येतील.यानंतर अर्गेलेंदर, हेन्री ड्रेपर, येल वेधशाळा इत्यादींनी या नकाशांमध्ये आणि ताराकासमुहांमध्ये बरीच भर घातली. आजमितीस सर्व ८८ ताराकासमुहांचे अनेक नकाशे संगणकावर उपलब्ध आहेत.

तारका गोष्टी

ताराकासमुहांचे आकार, एकमेकांसापेक्ष स्थाने लक्षात ठेवण्यासाठी ग्रीक पुराणांतील वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला गेला. हीच संकल्पना भारतीयांनी देखील वापरली ज्यात आपल्याला भारतीय पुराण कथांचा वापर आढळतो. उदाहरणार्थ उत्तर आकाशातील शर्मिष्ठा (Cassiopeia) ,देवयानी (Andromeda),ययाती (Perseus) आणि वृषपर्वा (Cephus) हे तारकासमूह महाभारतातील एका कथेत गुंफल्याचे आपल्याला आढळते.

Yayati-Devyani_Fotorदेवयानी ही दैत्यगुरु शुक्राचार्यांची कन्या, तर शर्मिष्ठा ही दैत्यराज वृषपर्व्याची कन्या. या दोघी घनिष्ट मैत्रिणी.एकदा त्या जल विहारासाठी गेल्या असताना जोराचे वादळ आले आणि घाई गडबडीत निघताना त्यांच्या वस्त्रांची अदलाबदल झाली. आपल्या वडिलांच्या पदरी नोकरी करणाऱ्या शुक्राचार्यांच्या कन्येने, देवयानीने, आपली वस्त्रे चढवली याचा राजकन्या शर्मिष्ठेलाला राग आला आणि देवयानीला विहिरीत ढकलून ती निघून गेली.या वेळी वनात शिकारीसाठी आलेल्या हस्तिनापुर नरेश ययातीने देवयानीच्या हाका ऐकल्या आणि तिला विहिरीबाहेर काढले.तिच्या सौन्दर्या वर भाळून त्याने तिला मागणीही घातली.

देवयानीने ही मागणी मान्य करतानाच, शर्मिष्ठेने आपली दासी बनून आपल्याबरोबर आले पाहिजे अशी अट आपल्या समोर मांडली. शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येच्या जोरावर राज्य उपभोगणाऱ्या दैत्यराज वृषपर्व्याला ही अट मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते.आपल्या पित्याचा व राज्याचा विचार करत शर्मिष्ठादेखील देवयानी बरोबर दासी म्हणून जाण्यास तयार झाली. हीच गोष्ट तारकासमूह लक्षात ठेवण्यासाठी वापरली आहे.

आकाशातील प्राणी सृष्टी

आकाशातील ८८ ताराकासमुहांमध्ये विविध जातकुळीतील प्राण्यांचे बरेच आकार कल्पिलेले आढळतात.उदाहरणार्थ सिंह (Leo) रास, लघु सिंह (Leo Minor), गवय(Lynx) हे मार्जार कुलीन प्राणी आहेत, तर ब्रहलुब्धक (Canis Major) ,लघुलुब्धक (Canis Minor) ,शामशबल (Canes Venatici) ही कुत्र्यांची जोडी हे श्वान कुलीन तारकासमूह आहेत.

घोडा हा आकाशातील कदाचित सर्वात जास्त स्थान व मान मिळवणारा प्राणी असावा. अश्वांचे हे सर्व प्रकार असामान्य व दैवी आहेत.यात पंख लावून उडणारा महाश्व (Pegasus) हा तर इंद्राचाच अश्व तर Equuleus हा अश्वमुख तारकासमूह. शृंगाश्व(Monoceros) हा एकशिंगी घोडा तर धनु रास तयार करणारा नरतुरग (Sagittarius) हा अर्धा मानव आणि अर्धा अश्व. मीन (Pisces) ,दक्षिण मत्स्य ,धनिष्ठा (Delphinus), तिमिन्गल(Cetus) ही समुद्री श्वापदे व मासे तर याच बरोबर आकाशात विहरणारे हंस (Cygnus) ,वृक्, शशक, सरठ (Lacerta) असे पक्षी ,प्राणी व वासुकी(Hydra), भुजंग(Serpens) असे भितीप्रद सर्प देखील आहेत.यातील वासुकी हा आकाशातील मोठा तारकासमूह आहे. Andromeda सारखी महाराणी ,कन्या (Virgo) राशीची नाजूक कन्यका,ओरायन हा शिकारी योद्धा,उत्तर मुकुट,ढल(Scutum), वजन मापे करण्यासाठी तुला,(Libra), दूरदर्शी (Telescopium), सुक्ष्मदर्शी (Microscopium), विहारासाठी नौका (Argo Navis) अशा अनेक परिचित गोष्टीनी ही प्रती सृष्टी नटलेली आहे. आगळ्या वेगळ्या विश्वामित्राच्या या प्रती सृष्टीतून फेरफटका मारताना आपणही खऱ्या अर्थाने विश्वामित्रच होऊन जाऊ यात शंकाच नाही.