वैज्ञानिक पर्यटनस्थळ लोणार

Lonar Panoramic-Samअजंठा , वेरूळ हि जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. प्राचीन चित्र आणि शिल्पकलेचा अद्वितीय वारसा सांभाळणाऱ्या या ठिकाणांच्या जवळच सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आपल्या महाराष्ट्रातच निसर्गाने बहाल केलेल्या अतिप्राचीन अशा वैज्ञानिक वारश्याने सजलेले एक पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे लोणार

सुमारे ५०,००० वर्षापूर्वीची तो घटना असावी अवकाशात इतस्तत: भरकटत फिरणाऱ्या अनेक उल्काभांपैकी एक उल्काभ पृथ्वीच्या दिशेने झेपावला. वातावरणाचे कवच भेदत तो भूपृष्ठाकडे सरकला आणि त्याने आघात केला तो दगडी छातीच्या महाराष्ट्र भूमीवर. आज याच आघाताची खूण हि महाराष्ट्र भूमी गौरवाने मिरवते आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या तालुक्याच्या गावी. पृथ्वीवर पडलेल्या या अशनीने तयार झालेला हा खड्डा वा विवर सुमारे १.८ कि मी व्यासाचे आहे.

विवराचे रुपांतर सरोवरात

जागतिक नकाशावर देखील लोणारचे विवर आले तेदेखील अनेक संशोधकांच्या परिश्रमाने. लोणारच्या सपाट प्रदेशमध्ये असणारा एवढा मोठा वर्तुळाकृती आकाराचा हा खड्डा निश्चितच कुतूहल जनक होता. या ठिकाणी असणाऱ्या गोड्या पाण्याच्या झऱ्या मुळे या विवाराचे रुपांतर सरोवरात झालेले होते. अश्या ठिकाणी एखादे सरोवर वा विवर का असावे याचा शोध घेण्याचा प्रयत्न बऱ्याच आधीपासून झालेला आढळतो. बरीचशी विवरे ज्वालामुखीजन्य देखील असू शकतात. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर लाव्हारसाचे थर तयार होतात. या विवर परिसरातही असे ठार आढळून येतात. परंतु दक्खन पठारावरील ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यामुळे तयार झालेले ज्वालामुखीचे थर हि लाखो वर्षापूर्वीची प्रक्रिया आहे , त्यामानाने हे विवर अगदीच तरुण म्हणजे सुमारे ५०,००० वर्षाचे असल्याचे तेथील भूगार्भाच्या अभ्यासावरून आढळले आहे.
लोणारच्या विवराचे वेगळेपण लक्षात घेत याचा अभ्यास जे. ई. अलेक्झांडर यांनी १८२३ मध्ये केल्याचा आढळतो. तर १८९६ मध्ये जी. के. गिल्बर्ट या संशोधकाने अमेरिकेतील अरिझोना विवराचे या विवरशी साधर्म्य असल्याचे सुचविले होते. यांचा सुरुवातीचा रोख मात्र हे विवर ज्वालामुखीजन्य असावे असाच होता. परंतु १९७५ च्या सुमारास भारतीय भू-सर्वेक्षण संस्था आणि अमेरिकेतील स्मिथसोउनिअन इन्स्टीटूट यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासात हे विवर अशनी आघात विवर असल्याचे सिद्ध झाले.

लोणारला कसे जाणार ?

लोणारला जाण्यासाठी रेल्वेच्या मलकापूर , नांदुरा , जलंब , शेगाव किंवा अकोला या स्थानकांवर उतरून मेहेकर मार्गे जाता येऊ शकते. औरंगाबाद हून जालना , देऊळगावराजा , सिंदखेडराजा , सुलतानपूर मार्गे लोणारला जाता येते. या मार्गाने स्वताच्या वाहनाने गेल्यास वाटेत थांबून इतरही काही महत्वाची स्थळे पाहत येतात. यात देऊळगावराजाचा अंगठ्या एवढा बालाजी , सिंदखेडराजा या जिजाबाई च्या माहेर गावातील लखुजी जाधव रावांचा वाडा , पुतळा बारव इत्यादींचा समावेश होतो.

लोणार मध्ये काय पाहाल ?
Lonar Sketch Maheshलोणार गावातील लोणार विवर सरोवराचे दर्शन हीच एकमेव महत्वाची गोष्ट नसून या विवरात उतरून तेथून मारलेला फेरफटका फार महत्वाचा आहे. या विवरातील पाण्याच्या काठावर अनेक मंदिरे आढळतात. विवराच्या पूर्व काठावर असलेल्या शासकीय विश्राम धामाच्या दक्षिणेकडे असलेल्या पायऱ्या उतरून गेल्यास आपल्याला संपूर्ण विवराच्या फेरीमध्ये पुढील विवरे दिसतात.
रामगया मंदिर : पश्चिमा भिमुख असलेल्या या मंदिरात फक्त रामाचीच मूर्ती आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजा समोर मारुती असलेली घुमटी आहे.
शंकर गणेश मंदिर : यात मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराची पिंडी असून गणेश मूर्ती गाभाऱ्याच्या दरवाजासमोर आहे.
वाघ महादेव मंदिर : हे मंदिर काठाच्या जवळ असून बरेचसे झाडीत लपलेले आहे.
मोर महादेव मंदिर : सरोवराच्या काठाशी असलेल्या या पूर्वाभिमुख मंदिरात काहीशी भंगलेली पिंडी आहे.

कमलजा देवी मंदिर
कमलजा देवी मंदिर

कमलजा देवी मंदिर : विवरातील हे सर्वात प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात भाविकांची वर्दळ असल्याने हे चांगल्या स्थितीत आहे. नवरात्रीत येथे जत्रा भरते. मंदिराला दिल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगामुळे हे मंदिर दुरूनही ओळखता येऊ शकते. मंदिरासमोर दीपमाळ असून गोड्या पाण्याची विहिर्देखील आहे परंतु हि विहीर सरोवराच्या खाऱ्या पाण्याखाली बुडालेली असते.
अंबरखाना महादेव मंदिर : सरोवराच्या पश्चिम काठावरील हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात पिंडी आणि गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेश पट्टी आहे.
मुंगळा महादेव मंदिर : पूर्वाभिमुख पण पडक्या अवस्थेतील मंदिर
चोपड्याचे महादेव मंदिर : पूर्वाभिमुख पण पडक्या मंदिरातील पिंडी मात्र चांगल्या अवस्थेत आहे.
शुक्राचार्य शाळा : सरोवराच्या परीक्रमेतील ईशान्य कडेवरील हे शेवटचे मंदिर. येथे बरेच कोरीव काम असलेले दगड आढळतात. मंदिराचे खांब , गाभाऱ्याचा घुमट यावर विविध प्रकारची नक्षी , देवदेवता कोरलेल्या आहेत. येथील पिंडी उघड्यावर असून मोठ्या आकाराचा नंदी मात्र गाभाऱ्यात सूरक्षित आहे.

धार मंदिर समूह :
शुक्राचार्य शाळा मंदिराकडे असणाऱ्या खाचेतून वर चढले असता धार मंदिर समूह लागतो. वर्षाचे बाराही महिने येथील गोमुखातून पडणारी संतत धार हे या धारा मंदिराचे वैशिष्ठ . हेच गोडे पाणी पुढे विवराच्या पाण्याला जाऊन मिळते.

धारेसामोरील वडाच्या झाडाखालील जागा महानुभाव पंथीयांच्या चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली असल्याचे सांगण्यान येते. देवगिरीचे सम्राट कृष्णदेवराय यांचे गर्वहरण केल्याची कथा देखील लीळा चरित्रात दिलेली आहे.
सम्राट कृष्णदेवरायाने ओतलेल्या संपत्तीकडे ढुंकूनही न पहाता चक्रधरस्वामी मठात निघून गेले. या महापुरुषाचा हा निस्वार्थी पणा पाहून सम्राटाला आपली चूक उमगली आणि ते चक्रधर स्वामींना शरण गेले अशी ती कथा आहे. धार मंदिर समूहात शिव , विष्णू , गणपती , जगदंबा अशी काही मंदिर आहेत.

दैत्य सुदन मंदिर :

दैत्यसुदन मंदिर
दैत्यसुदन मंदिर

लोणार गावात देखील पाहण्या सारखे एक सुंदर मंदिर आहे ते म्हणजे दैत्यसुदनाचे. इ.स. १८७८ मध्ये मातीच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करीत असता या मंदिराचे अस्तित्व लक्षात आले. उत्तराभिमुख महाद्वार असणाऱ्या या मंदिराचा आकार अनियमित ताऱ्यासारखा आहे. अनेकविध देवतांची शिल्पे आणि कामशिल्पे असणाऱ्या या मंदिरावर असणारे लवणासुर वध कथा हे विवर निर्मितीशी संबंध दर्शविणारे शिल्पादेखील आहे. याची कथा पद्म पुराणांत सांगितली आहे. उन्मत्त झालेल्या लवणासूर या दैत्याचे पारिपत्य करण्याची विनंती पृथ्वीने श्री विष्णूस केली तेव्हा या दैत्याला मी आघात रूपाने मारेन असे श्री विष्णूनी पृथ्वीला सांगितले. तेव्हा या आघात वेळी आपलाही नाश होऊ नये अशी विनंती पृथ्वीने केली तेव्हा विष्णूने हा आघात बालरूपात येउन केला आणि लवणासुराचा वध केला. त्याच

दैत्यसुदन मंदिर
दैत्यसुदन मंदिर

लवणासुराच्या अस्थींमुळे हे विवर खाऱ्या पाण्याचे झाले असे या कथेत सांगितले आहे.
अंबरतळे आणि झोपलेला मारुती :
लोणारच्या विवराच्या उत्तरेकडे असलेल्या विवराला अंबरतळे या नावाने ओळखले जाते. हे एक छोटे विवर असून याच्या जवळ निद्रिस्त मारुतीचे एक देऊळ आहे. या मारुतीच्या मूर्तीजवळ चुम्बाक्सुची नेताच तिचे विचलन होते.

वैज्ञांनिक वारश्याची निगा

हळू हळू एक महत्वाचे पर्यटन केंद्र बनत चाललेल्या लोणारला हजारो पर्यटक भेट देत असतात. पण पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळेच येथील पर्यावरणाला धोका निर्माण होऊ लागला आहे. पर्यटकांचे थवे आपल्या बरोबर आणलेले खाद्यपदार्थ आणि प्लास्टिकच्या पिशव्या तेथेच टाकून जातात आणि त्यांची विल्हेवाट लावणे कठीण असल्यामुळे हा परिसर बकाल होऊ पाहत आहे. गावातील एक शिक्षक श्री सुधाकर बुगदाणे यांच्या अथक परिश्रमाने लोणार विवर शासनाच्या आणि पर्यटकांच्या नजरेत आले तर खरे पण याच्यामुळे या परिसराचा विकास न होता येथील बकालपणा वाढेल अशीच भीती वाटते. यासाठी सर्व पर्यटकांनी देखील साथ देणे गरजेचे आहे कारण हा ठेवा केवळ लोणारचाच नसून , महाराष्ट्राचा व भारताचा देखील आहे