आपल्या सभोवार पसरलेल्या आकाशाचा आणि अथांग अवकाशाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच खगोलशास्त्र. आकाशात रोज रात्रो चमचमणाऱ्या असंख्य तारका,अग्नी गोलासारखा भासणारा आणि दिवसा सर्व दिशा उजळून टाकणारा सूर्य, पृथ्वीच्या विशिष्ठ स्थितीमुळे निर्माण होणारे ऋतू या सर्वांची सांगड घालण्याचा प्रयत्न मानवाने केला नसता तरच नवल! आणि मग त्यातूनच अमुक एका तारका समूहात सूर्य किवा चंद्र असला की एखादी घटना घडून येते असे लक्षात येऊ लागले आणि त्यातूनच ठोकताळे बांधणारे अंदाजशास्त्र तयार झाले.
खगोल शास्त्राचा विकास मात्र धीम्या गतीने परंतु ठामपणे होत होता.या विकास वाटेवर खगोल शास्त्राला धर्म- सत्तेचा व राजसत्तेचाही सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात पृथ्वी हीच विश्वाचा केंद्रबिंदू असल्याची पाश्च्यात्य संकल्पना रूढ झाली होती. ह्या संकल्पनेला धक्का देणारा सूर्यकेंद्री विश्वाचा सिद्धांत इ.स:-१५४३ मध्ये कोपर्निकसने मांडताच त्याला तत्कालीन धर्मसंस्थांनी प्रखर विरोध केला. अर्थातच त्या नंतरच्या केप्लर, गेलिलीओ, न्यूटन आदि खगोल शास्त्रज्ञांनी केलेल्या निरीक्षणांद्वारे कोपर्निकसच्या सिद्धांताचे प्रमाण मिळाल्यानंतर त्याची संकल्पना सर्वमान्य झाली ही बाब वेगळी.
दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम खागोलशास्त्रासाठी करणाऱ्या महान इटालीअन खगोल शास्त्रज्ञ गेलिलीओ गलिली ह्याला देखील अश्या प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. त्याच्यावर धर्मसत्तेविरुद्ध कट करण्याचा आरोप देखील ठेवला गेला.१७ व्या शतकात लावलेले हे आरोप तब्बल तीन शतका नंतर,म्हणजेच १९९२ साली (२० व्या शतकात) मागे घेण्यात आले.
गुढ जाणून घेण्याची मानवी मनाची उत्सुकता त्याच्या विकासाला कारणीभूत ठरत असते.खगोल शास्त्राचा विकास देखील ह्याच तत्वावर आधारलेला आहे.सूर्य आकाशातून भ्रमण करीत असताना त्याच्या तेजामुळे त्याच्या पार्श्वभूमीवरील तारकासमूह पाहता येत नाही. चंद्राच्या भ्रमणमार्गावरील तारकासमूह मात्र त्याच्या पार्श्वभूमीवर पाहता येतात. याचाच वापर करत प्राचीन भारतीयांनी आकाशाची विभागणी चान्द्रमार्गावरील २७ तारकासमुहात केली आणि या ताराकासामुहाना नक्षत्र असे संबोधले.मात्र पाश्चात्यांनी सूर्याचा वर्षाभराचा कालावधी १२ ताराकासमुहान मध्ये विभागला.ज्याना आपण राशी म्हणून ओळखतो.सूर्य व चंद्राचे भ्रमण मार्ग एकाच असल्यामुळे या १२ राशींचे २७ नक्षत्रांमध्ये विभाजन झालेले दिसते. २९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधी मध्ये सूर्य कोणत्याही प्रचलित राशीत नसून तो वृश्चिक आणि धनु या राशींच्या दरम्यान असणाऱ्या भुजंगधारी या तारकासमुहात असतो व म्हणूनच आत्ता भूजंगधारी ताराकासमुहाला १३वी रास म्हणून मान्यता मिळाली आहे.
रात्रीच्या चमकत्या ताऱ्यांनी खचाखच भरलेल्या आकाशात नेमका तारा शोधणे आपल्याला कठीण वाटू शकते.आपल्या पूर्वजांना देखील याची जाणीव होती.व म्हणूनच तारकासमुहांचे आकार लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी अगदी सोपा मार्ग अवलंबिला.तो म्हणजे या ताऱ्यांच्या विशिष्ठ समूहाना वेगवेगळे प्राणी,पक्षी,मानवी आणि दैवी आकृत्यात जोडून त्यांच्यावर गोष्टी गुंफण्याचा. या मार्गाद्वारे आकाश लक्षात ठेवणे व नकाशावर उतरवणे देखील सोपे झाले.
अशा प्रकारची काल्पनिक विभागणी सर्वप्रथम कधी झाली असावी हे सांगणे अवघड असले तरी विविध् आकृत्यात गुंफलेले हे तारकासमूह प्राचीन शिल्पाकृतीतही आढळून येतात.ग्रीक कवी अरेटस याने इसवी सनापूर्वी २७५ मध्ये रचलेल्या “ द फेनामेना“ या काव्यात काही तारका समूहांच्या नावांचा उलेख आढळतो, तर इसवी सनापूर्वी १५० मध्ये “हिप्पार्कस” या ग्रीक खगोल शास्त्रज्ञाने तयार केलेल्या नकाशांमध्ये,ताऱ्यांची विभागणी व त्यांच्या तेजस्विते नुसार केलेली वर्गवारी ही आढळते.
हिप्पार्कसच्या नंतर हे काम अत्यंत शिस्तबद्धपणे केले ते ”टोलेमी” या दुसऱ्या ग्रीक तत्त्ववेत्याने.इसवी सनानंतरच्या दुसऱ्या शतकात १०२२ ताऱ्यांचा नकाशा तयार करण्याऱ्या टोलेमीने Almagest या आपल्या ग्रंथात या ताऱ्यांचे तेजस्विते प्रमाणे वर्गीकरण देखील केले.आणि त्याना १(जास्त तेजस्वी) ते ६ (कमी तेजस्वी) असे प्रत क्रमांक दिले.त्याची ही वर्गीकरण पद्धत आजही वापरली जाते.टोलेमीने ग्रीस मधून दिसणारे आकाश ४८ ताराकासमुहांमध्ये विभागले.पुढे जसजसे निरीक्षणाच्या पद्धती व साधने यांचे आधुनिकीकरण झाले तसतसे या नकाशातील ताराकासामुहांमध्ये भर पडत गेली. मात्र मूळ संकल्पना आजही तीच आहे.
इ.स.१६०३ मध्ये योहान बायरने तयार केलेले आकाश नकाशे हे काहीसे आद्य मानता येतील.यानंतर अर्गेलेंदर, हेन्री ड्रेपर, येल वेधशाळा इत्यादींनी या नकाशांमध्ये आणि ताराकासमुहांमध्ये बरीच भर घातली. आजमितीस सर्व ८८ ताराकासमुहांचे अनेक नकाशे संगणकावर उपलब्ध आहेत.