तारका गोष्टी
ताराकासमुहांचे आकार, एकमेकांसापेक्ष स्थाने लक्षात ठेवण्यासाठी ग्रीक पुराणांतील वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला गेला. हीच संकल्पना भारतीयांनी देखील वापरली ज्यात आपल्याला भारतीय पुराण कथांचा वापर आढळतो. उदाहरणार्थ उत्तर आकाशातील शर्मिष्ठा (Cassiopeia) ,देवयानी (Andromeda),ययाती (Perseus) आणि वृषपर्वा (Cephus) हे तारकासमूह महाभारतातील एका कथेत गुंफल्याचे आपल्याला आढळते.
देवयानी ही दैत्यगुरु शुक्राचार्यांची कन्या, तर शर्मिष्ठा ही दैत्यराज वृषपर्व्याची कन्या. या दोघी घनिष्ट मैत्रिणी.एकदा त्या जल विहारासाठी गेल्या असताना जोराचे वादळ आले आणि घाई गडबडीत निघताना त्यांच्या वस्त्रांची अदलाबदल झाली. आपल्या वडिलांच्या पदरी नोकरी करणाऱ्या शुक्राचार्यांच्या कन्येने, देवयानीने, आपली वस्त्रे चढवली याचा राजकन्या शर्मिष्ठेलाला राग आला आणि देवयानीला विहिरीत ढकलून ती निघून गेली.या वेळी वनात शिकारीसाठी आलेल्या हस्तिनापुर नरेश ययातीने देवयानीच्या हाका ऐकल्या आणि तिला विहिरीबाहेर काढले.तिच्या सौन्दर्या वर भाळून त्याने तिला मागणीही घातली.
देवयानीने ही मागणी मान्य करतानाच, शर्मिष्ठेने आपली दासी बनून आपल्याबरोबर आले पाहिजे अशी अट आपल्या समोर मांडली. शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येच्या जोरावर राज्य उपभोगणाऱ्या दैत्यराज वृषपर्व्याला ही अट मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते.आपल्या पित्याचा व राज्याचा विचार करत शर्मिष्ठादेखील देवयानी बरोबर दासी म्हणून जाण्यास तयार झाली. हीच गोष्ट तारकासमूह लक्षात ठेवण्यासाठी वापरली आहे.
आकाशातील प्राणी सृष्टी
आकाशातील ८८ ताराकासमुहांमध्ये विविध जातकुळीतील प्राण्यांचे बरेच आकार कल्पिलेले आढळतात.उदाहरणार्थ सिंह (Leo) रास, लघु सिंह (Leo Minor), गवय(Lynx) हे मार्जार कुलीन प्राणी आहेत, तर ब्रहलुब्धक (Canis Major) ,लघुलुब्धक (Canis Minor) ,शामशबल (Canes Venatici) ही कुत्र्यांची जोडी हे श्वान कुलीन तारकासमूह आहेत.
घोडा हा आकाशातील कदाचित सर्वात जास्त स्थान व मान मिळवणारा प्राणी असावा. अश्वांचे हे सर्व प्रकार असामान्य व दैवी आहेत.यात पंख लावून उडणारा महाश्व (Pegasus) हा तर इंद्राचाच अश्व तर Equuleus हा अश्वमुख तारकासमूह. शृंगाश्व(Monoceros) हा एकशिंगी घोडा तर धनु रास तयार करणारा नरतुरग (Sagittarius) हा अर्धा मानव आणि अर्धा अश्व. मीन (Pisces) ,दक्षिण मत्स्य ,धनिष्ठा (Delphinus), तिमिन्गल(Cetus) ही समुद्री श्वापदे व मासे तर याच बरोबर आकाशात विहरणारे हंस (Cygnus) ,वृक्, शशक, सरठ (Lacerta) असे पक्षी ,प्राणी व वासुकी(Hydra), भुजंग(Serpens) असे भितीप्रद सर्प देखील आहेत.यातील वासुकी हा आकाशातील मोठा तारकासमूह आहे. Andromeda सारखी महाराणी ,कन्या (Virgo) राशीची नाजूक कन्यका,ओरायन हा शिकारी योद्धा,उत्तर मुकुट,ढल(Scutum), वजन मापे करण्यासाठी तुला,(Libra), दूरदर्शी (Telescopium), सुक्ष्मदर्शी (Microscopium), विहारासाठी नौका (Argo Navis) अशा अनेक परिचित गोष्टीनी ही प्रती सृष्टी नटलेली आहे. आगळ्या वेगळ्या विश्वामित्राच्या या प्रती सृष्टीतून फेरफटका मारताना आपणही खऱ्या अर्थाने विश्वामित्रच होऊन जाऊ यात शंकाच नाही.