धूमकेतू … बुध दर्शन व शुक्र ग्रहाला अलविदा !

सध्याच्या कोविडच्या संकटामुळे सर्व जगावर घरी बसण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचवेळी आकाश मात्र नवीन घटनांनी बहरत आहे. एक नाही तर दोन धूमकेतू अचानक तेज:पुंज होत आहेत आणि संध्याकाळचे आकाश त्यांच्या सौंदर्याने प्रकाशले जाणार आहे.

ग्रीन झोनमधील भाग्यवान लोकांना, ज्यांना आकाश स्पष्टपणे दिसते आहे, त्यांच्यासाठी कोणत्याही दुर्बिणीशिवाय नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारा हिरव्या रंगाचा स्वॅन धूमकेतू (Comet C/2020 F8 SWAN) ओळखण्यासाठीचे नकाशे येथे देत आहे.

स्वॅन धूमकेतूची सध्याची दृश्यप्रत ३.० असून तो तेजस्वीपणे चमकत आहे. याचा अर्थ असा की  मुंबईच्या आकाशातून सहजपणे दिसणार्‍या कोणत्याही ताऱ्याइतका हा धूमकेतू सध्या तेजस्वी आहे. जर आपल्याला मावळतीचे आकाश दिसत असेल तर सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे आज (२४ मे २०२०)  आपल्याला चंद्र दिसेल. त्याच्या जवळ आज रात्री बुध असेल. चंद्रापासून बुधा पर्यंतची रेखा सरळ पुढे ब्रह्महृदय (Capella) ताऱ्यापर्यंत वाढवा व पुढे क्षितिजाच्या दिशेने, चंद्र ते ब्रह्महृदय एवढे अंतर खाली आल्यास स्वॅन धूमकेतु दिसेल.

चित्र क्र. १: स्वॅन धूमकेतु नकाशा

स्वॅन धूमकेतु पाहण्याची उत्तम संधी कदाचित 2 जून 2020 ला आहे. या दिवशी हा धूमकेतु ब्रह्महृदय (Capella) ताऱ्याच्या अगदी बाजूला असेल. सारथी तारकासमूहातिल सर्वात तेजस्वी  ब्रह्महृदय तारा 0.8 प्रतीचा निळा राक्षसी तारा आहे आणि त्या दिवशी सुमारे 20:40 वाजता तो मावळणार आहे. स्वॅन धूमकेतु सुमारे 4.० प्रतीचा असेल आणि छोट्या द्विनेत्री दुर्बिणीतून धूमकेतु सहज पाहता येईल. त्यादिवशीचा नकाशा खालीलप्रमाणे आहे.

चित्र. क्र. २: स्वॅन धूमकेतु व ब्रह्महृदय

आज म्हणजे २४ मे रोजी, तुमच्यातील बहुतेकांसाठी बुध पाहण्याची उत्तम संधी असू शकते. जर आपल्याला चंद्र सापडला तर त्याच्या बाजूला जवळच -०.४  प्रतीचा चमकदार पिवळसर बुध ग्रह दिसेल. क्षितिजाच्या दिशेने चंद्र-बुध यांच्या सोबत एक त्रिकोण तयार करत तेजस्वी शुक्र सुंदर दिसत आहे. आज रात्री चंद्र आणि शुक्र यांची कोर जवळजवळ सारखीच दिसेल! शुक्रासाठी संध्याकाळच्या आकाशाला अलविदा करण्याची वेळ आलेली आहे आणि काही दिवसांनंतर तो सूर्यप्रकाशात झाकोळला जाईल. ३ जूनला शुक्राची अंतर्युती असेल व त्यांतर तो सकाळी दिसू लागेल.

चित्र. क्र. ३: चंद्र-बुध-शुक्र: संध्याकाळच्या आकाशातील त्रिकुट

सकाळच्या आकाशातही ग्रहांची गर्दी दाटली आहे. मध्यरात्रीनंतर गुरु, शनि आणि मंगळ एका सरळ रेषेत व स्पष्ट दिसतात.

चित्र क्र. ४: गुरु-शनि-मंगळ पहाटेच्या आकाशात

आणखी एक धूमकेतू आपल्याला आकाशात लवकरच दिसू शकेल. लेमन धूमकेतू (Comet Lemmon C /2019 U ) म्हणून ओळखला जाणारा हा धूमकेतु सध्या दुर्बिणीचा वापर करून दिसू शकेल. मे २०२० अखेर हा धूमकेतू अंदाजे ६व्या प्रतीचा असेल. २१ जून २०२० रोजी हा धूमकेतू वासुकीहृदय (Alphard) ताऱ्याजवळ सुमारे ४ प्रतीचा बऱ्यापैकी तेजस्वीपणे चमकत असेल.

चित्र. क्र.५: लेमन धूमकेतू: उजाळणारा प्रवास

डॉ. अभय देशपांडे 

नकाशा: Cartes-du-Ciel

छायाचित्र: C. Gloor (Creative Common License)

Leave a Reply